Amravati : यादी तयार, मग घोडे अडले कोठे? राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सरकारला प्रश्न

Image

अचलपूर : मागील २३ वर्षांपासून राज्यातील ७१० वैद्यकीय अधिकारी ब गट संवर्ग पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. याप्रकरणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. ज्यामुळे संघटनेच्या लढ्यामुळे राज्य शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी २४ मध्ये प्रसिद्ध केली. मात्र सहा महिने झाले तरी या यादीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही. जर पदोन्नतीची यादी तयार आहे, तर घोडे अडले कोठे? असा प्रश्न राज्यातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारला केला आहे. शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना ठराविक सेवेनंतर विभागीय पदोन्नती देण्यात येते. परंतु आरोग्य विभागातील गट ब वैद्यकीय अधिकारी संवर्ग कायमच पदोन्नतीच्या लाभापासून उपेक्षित राहिला आहे. संघटनेकडून वारंवार मागणी करून व नियमित पाठपुरावा करूनही राज्यातील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला नाही. ही या अधिकाऱ्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. कित्येक अधिकारी पात्र असूनही या लाभापासून वंचित राहत आहेत. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे जानेवारी २०२४ मध्ये वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या पदोन्नतीस आवश्यक सेवा ज्येष्ठता यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. ७१० वैद्यकीय अधिकारी गट ब हे १७ वर्षांपासून एकाच पदावर आणि तेही अतिरिक्त पदभार घेऊन काम करीत आहेत. मात्र त्यांना पदोन्नतीचा कसलाही लाभ मिळत नाही. यामुळे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. कोळी यांच्यासह डॉ. साऊरकर, वंदना ठाकरे, देवके यांनी केली आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!