Bhagyashree Sude Case : भाग्यश्री सुडे खुनाचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवा ; अधिवेशनात देशमुख यांची मागणी

Image

लातूर : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या लातूरच्या विद्यार्थिनीचा ३० मार्च रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या खुनाचा खटला चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन व्हावे. ते लातूर येथे चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनादरम्यान स्थगन प्रस्तावाद्वारे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व आमदार अमित देशमुख यांनी सोमवारी (ता. एक) केली. मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अमित देशमुख यांनी स्थगन प्रस्ताव मांडून लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे राहणाऱ्या सुडे कुटुंबीयांना न्याय द्यावा, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, सूर्यकांत सुडे यांची कन्या भाग्यश्री सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. यातून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी लातूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह यलम समाज बांधवांची मागणी आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ एप्रिल रोजी लातूर शहरात मोर्चा काढण्यात आला होता. राज्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, भाग्यश्री सुडेचा अपहरण व खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली. या प्रस्तावाची दखल घेऊन सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारने गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!